अकाेला : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही. १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु याकरिता ग्रामपंचायत व पालकांच्या ‘ना हरकत’ची गरज आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी वर्ग आनंदात आहे.
कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापकांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळा १८६८
शासकीय ९१२
अनुदानित ६७४
विनाअनुदानित २८२
जिल्ह्यातील एकूण गावे ९९८
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे ९२०
तालुकानिहाय गावे
अकोला १९७
अकोट १८१
मूर्तिजापूर १६४
बार्शीटाकळी १५९
पातूर ९६
बाळापूर ९९
तेल्हारा १०२
आतापर्यंत १ ग्रामपंचायतचा ठराव
काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत अकाेला तालुक्यातील कापशी ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. साेमवार, १२ जुलै रोजी शाळा सुरू हाेणारे कापशी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे.
पालकांचीही हा...
मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे, तर घरच्या घरी राहून मुलांचीसुद्धा चिडचिड वाढली आहे. शाळा सुरू झाल्यास आम्ही पाल्यांना शाळेत पाठवू; परंतु शाळेने योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
- सुनीता जटाळ, पालक
जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून, सर्व व्यवहारही सुरळीत सुरू आहेत. अशा वेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मुलेही घरच्या घरी राहून त्रस्त झाली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवू.
- रवी मोहोड, पालक
शिक्षणाधिकारी म्हणतात...
शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोरोनामुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासाठी सर्व पालक, शिक्षकांकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. सर्वेक्षणात आपले मत नोंदवावे.
- डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
पहिली ते आठवीचे तालुकानिहाय विद्यार्थी
अकोला पं.स.- ९१६७४
अकोट- ३४४५५
बाळापूर- २५५२४
बार्शीटाकळी- १७०११
मूर्तिजापूर- २००६३
पातूर- १७१६५
तेल्हारा- २१८४२
मनपा क्षेत्र- ७४७९
एकूण- २३५२१३