मार्च महिन्यात देशाच्या विविध भागात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहून त्याला अटकाव घालण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य शासनाने २३ मार्चपासून टाळेबंदीची घाेषणा केली. अचानक आलेल्या संकटामुळे सर्व उद्याेग, व्यवसाय पार काेलमडून गेले. तसेच शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. ही स्थिती जून, जुलै महिन्यात पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा हाेती; परंतु आजही काेराेनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली असली तरी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवाला धाेका नकाे, या विचारातून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम शहरातील खासगी शाळा संस्थाचालकांवर झाला असून, त्याठिकाणी उपलब्ध असलेली स्कूलबस सुविधा पूर्णपणे बंद झाली आहे. ही बाब लक्षात घेता काही संस्थाचालकांनी नातेवाईक असलेल्या स्कूलबस चालकांना शाळेच्या आस्थापनेत सामावून घेतले आहे; परंतु इतर चालकांना काही दिवसांसाठी पर्यायी मार्ग निवडण्याची सूचना दिल्यामुळे त्यांच्यावर भटकंतीची वेळ आली आहे. आज शहरात सुमारे २४० स्कूलबसेस आहेत. स्कूल बंद असल्याने बसचालक आर्थिक संकटात सापडले असून, शाळा सुरू हाेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मनपाचे ट्रॅक्टर, टिप्परचा पर्याय
शहरात उघड्यावरील कचरा संकलित करण्यासाठी मनपाकडे ३३ ट्रॅक्टर व घराेघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२२ घंटागाड्या आहेत. यापैकी काही ट्रॅक्टर व घंटागाड्यांवर चालकांनी काम मिळवल्याची माहिती आहे. दुसरीकडे गाैण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक व टिप्पर आदी वाहनांच्या माध्यमातूनही स्कूलबस चालकांनी तात्पुरता राेजगार निवडल्याचे दिसत आहे.
स्कूलबसच्या माध्यमातून दाेन पैसे कमावता येतील, या उद्देशातून बॅंकेचे कर्ज घेऊन वाहनाची खरेदी केली; परंतु काेराेनामुळे सर्व आशा, अपेक्षा धुळीस मिळाल्या असून, मागील नऊ महिन्यांपासून घरासमाेर स्कूलबस उभी ठेवण्यात आली आहे. बॅंकेचे हप्ते फेडण्याचे काम ठप्प झाले असून, शाळा लवकर सुरू हाेतील,अशी अपेक्षा आहे.
- सहदेव महल्ले, स्कूलबस मालक
चार वर्षांपूर्वी स्कूलबसची खरेदी केली. त्यापूर्वी टिप्परवर चालक हाेताे. स्वत:चे वाहन खरेदी करून खासगी शाळेतील मुलांची ने-आण सुरू केली. त्यापासून महिन्याकाठी चांगले उत्पन्न प्राप्त झाले. बॅंकेचे कर्ज लवकर अदा केले जाईल,अशी अपेक्षा हाेती; परंतु काेराेनामुळे अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
- माेहम्मद शकील, स्कूलबस मालक-चालक
सहा वर्षांपूर्वी शहरातील एका खासगी शाळेतील स्कूलबसवर चालक म्हणून नियुक्त झालाे. तीन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने शहरात मुक्कामी राहायला आलाे. भाड्याने घर घेतले आहे. नऊ महिन्यांपासून बस सुविधा बंद पडल्याने संस्थाचालकांनी काही दिवसांकरिता पर्यायी मार्ग स्वीकारण्याची सूचना केल्याने संकट निर्माण झाले आहे.
-अश्वजित कथले, स्कूलबस चालक
अल्प मानधनात शहरातील खासगी शाळेत स्कूलबस चालक म्हणून नियुक्त झालाे. मागील नऊ महिन्यांपासून काेराेनामुळे शाळा बंद असल्याचा परिणाम बस सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे गाैण खनिजाची वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पर्याय निवडला आहे. हे संकट लवकर दूर हाेण्याची प्रतीक्षा आहे.
-नारायण तायडे, स्कूलबस चालक