अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने ३७ अतिरिक्त शिक्षकांपैकी २८ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. या शिक्षकांना आॅनलाइन पद्धतीने शाळा देण्यात आल्या. या शाळांमध्ये त्यांचे समायोजन करण्यात आले; परंतु काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्यास संस्थाचालक नकार देत असल्यामुळे या शिक्षकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. उर्वरित ११ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर होणार आहे. त्यामुळे त्यांच्या समायोजनाचा प्रश्नही अधांतरीच आहे.शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिरिक्त ठरलेल्या एकूण ३७ शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया राबविली होती. दरम्यान, माध्यमिक शाळांमध्ये ६७ जागा रिक्त असल्यामुळे या शिक्षकांचे समायोजन सहजरीत्या होईल, असे वाटत होते; परंतु अनेक शाळांनी रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास नकार दिल्यामुळे ३७ अतिरिक्त शिक्षकांपैकी केवळ २८ शिक्षकांचे समायोजन करण्यात शिक्षण विभागाला यश आले. प्रारंभी गतवर्षी अतिरिक्त ठरलेले २३ शिक्षक शाळेविना होते आणि ते निवडणूक विभागात काम करीत होते. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने या सर्व शिक्षकांचे समायोजन करण्यात प्रथम प्राधान्य दिले. यामुळे यंदा १६ अतिरिक्त शिक्षकांपैकी केवळ पाचच शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. यंदा ११ अतिरिक्त शिक्षक समायोजनाविना राहिले आहेत. या शिक्षकांचे आता विभागस्तरावर समायोजन होईल किंवा त्यांना मूळ आस्थापनेवर काम करावे लागणार आहे. त्यातही समायोजन करण्यात आलेल्या अनेक शिक्षकांना नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. समायोजन करण्यात आलेल्या शाळांवर अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्यास शिक्षण संस्थाचालक कुचराई करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांना शिक्षण संस्थांनी रुजू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु शाळा रुजू करीत नसतील तर त्या शाळांचे अनुदान थांबविण्याचा आदेश द्यावा लागेल. उर्वरित ११ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन विभागस्तरावर करण्यात येईल.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक जिल्हा परिषद