अतुल जयस्वाल / अकोलापरीक्षा संपून उन्हाळय़ाच्या सुट्या सुरू झाल्या की, डोक्यावरचा ताण हलका झालेली बच्चेकंपनी अख्खे घर डोक्यावर घेऊन धिंगाणा घालते. त्यापैकी कुणी उन्हाळी शिबिरांमध्ये सहभागी होतात, तर कुणी मामाच्या गावाची वाट धरतात. अकोला शहरातील काही चिमुकल्यांनी मात्र उन्हाळय़ाच्या सुटीत लोकांमध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. जंगलांची बेसुमार कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. पृथ्वीवरील हिरवा शालू जागोजागी फाटल्यामुळे जागतिक तापमानवाढ, निसर्गाचे बिघडलेले चक्र, दुष्काळ असे भयंकर परिणाम समोर येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत उन्हाळा अधिक प्रखर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात तर यावर्षी अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षांची लागवड करून पृथ्वीला पुन्हा हिरव्या शालूने मढविणे हा एकमेव पर्याय आहे. ही बाब लक्षात घेऊन अकोला शहरातील संदेशनगर भागातील सागर कॉलनीतील सहा चिमुकल्यांनी लोकांना वृक्षारोपणासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला. 'चिल्ड्रेन ग्रुप'ची स्थापना त्यांनी केली. यासाठी १ मे, महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरला. कुणाचीही मदत न घेता या चिमुकल्यांनी घरोघरी, कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने अशा विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेऊन त्यांना वृक्षारोपणासाठी प्रेरित करण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत या चिमुकल्यांनी दीडशेपेक्षाही अधिक लोकांच्या भेटी घेऊन त्यांना वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे.
शालेय विद्यार्थी देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश!
By admin | Published: May 06, 2016 2:17 AM