अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी, समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप योजनेत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत ७ लाख ७० हजार ७८९ पुस्तके जिल्ह्यातील तालुकास्तरावर प्राप्त झाली आहेत.
समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शासकीय आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके वाटपाची योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत २०२१....२२ या वर्षीच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीमधील १ लाख ४१ हजार ९२० विद्यार्थ्यांसाठी ८ लाख ४१ हजार ६१५ पाठ्यपुस्तकांची मागणी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा कक्षामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सद्य:स्थितीत बंद असल्या तरी इयत्ता पहिली ते आठवीमधील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १० सप्टेंबरपर्यंत ७ लाख ७० हजार ७८९ पाठ्यपुस्तके महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर प्राप्त झाली आहेत. उर्वरित पाठ्यपुस्तकेदेखील लवकरच प्राप्त होणार आहेत.
पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांची
तालुकानिहाय अशी आहे संख्या !
तालुका विद्यार्थी
अकोला ४३३२१
अकोट २२२७७
बाळापूर १७६०६
बार्शिटाकळी १४६२९
पातूर १३८०५
मूर्तिजापूर १३१८६
तेल्हारा १७०९६
.........................................................
एकूण १४१९२०
.............................................................
पुस्तकांची एकूण मागणी
८४१६९५
आतापर्यंत प्राप्त पुस्तके
७७०७८९
.......................................
मोफत पाठ्यपुस्तकांचे
लवकरच विद्यार्थ्यांना वितरण !
जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीमधील १ लाख ४१ हजार ९२० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यासाठी ८ लाख ४१ हजार ६१५ पाठ्यपुस्तकांची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे करण्यात आली आहे. त्यापैकी १० सप्टेंबरपर्यंत ७ लाख ७० हजार ७८९ पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील तालुकास्तरावर प्राप्त झाली. प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके लवकरच जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांना वितरित करण्यात येणार असून, केंद्रप्रमुखांकडून संबंधित शाळांना आणि शाळांकडून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
.........................................
बाळापूर तालुक्यात प्राप्त होणार
एकात्मिक पाठ्यपुस्तके !
समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एकात्मिक पाठ्यपुस्तके प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने या तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना मोफत एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारपर्यंत बाळापूर तालुक्यात एकात्मिक पाठ्यपुस्तके प्राप्त होणार आहेत.