नितीन गव्हाळे ।अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने मंगळवारी १0 आॅक्टोबर रोजी सकाळी १0.१५ वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे.देशभरामध्ये दिवाळीचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीमध्ये आवाजी फटाके खरेदी करण्यासाठी मुले आणि युवकांचा अधिक आग्रह असतो. आवाजी व धूरयुक्त फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे दम्याचे, फुप्फुसाचे, श्वसनाचे आजार होतात. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर जनजागृती करून विद्यार्थ्यांचे आवाजी फटाक्यांची आतषबाजी टाळण्यासाठी मन परिवर्तन व्हावे या उद्देशाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्याचा निर्णय पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येऊन, त्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे.राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकत्रितपणे शपथ घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आदेशानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी शिक्षणाधिकाºयांनासुद्धा पत्र पाठवून सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत.