अकाेला : प्रदीर्घ लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे; मात्र याबाबत निर्णयाच्या अनेक बाबी स्पष्ट नसल्याने नियोजन करताना वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची तारेवरची कसरत होत आहे. यामुळे शासनाने अनेक मुद्दे स्पष्ट करावेत, अशी अपेक्षा मुख्याध्यापक व वर्गशिक्षक व्यक्त करीत आहेत.
शासन निर्णयात शाळा नेमके चार तास की चार तासिका, यात गोंधळ होत असल्याने मुख्याध्यापकांची नियोजन करताना गडबड होत आहे. याचबरोबर केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे शिक्षण ऑफलाइन देण्यात यावे, असे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे. ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक असल्याने या विषयाच्या शिक्षकांना रोज हजर राहण्यास सांगावे का, असा प्रश्नही मुख्याध्यापक विचारत आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थितीही ५० टक्के असणार आहे. एका वर्गात १५ विद्यार्थी बसविण्याबाबत आदेशात सांगण्यात आले आहे. यामुळे ९० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीचे सहा भाग होतील. यातील तीन वर्ग ऑफलाइन तर तीन वर्ग ऑनलाइन शिक्षण घेतील. एखाद्या पालकाने विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्यास नकार दिल्यास, त्याची तुकडी ज्या दिवशी ऑफलाइन भरेल, त्या दिवसाच्या त्याच्या अध्यपानाचे काय करावे, असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.