- संजय उमक
मूर्तिजापूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत जिल्ह्यात शाळा सुरू करणे योग्य नसल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे तर शाळा सुरू करून आमचे पाल्य कोरोनाबाधित होणार नाही याची हमी कोण घेणार असा सवाल पालकांनी केला आहे. यासंदर्भात विविध प्रश्न पालकांकडून उपस्थित आहेत.
२३ नोव्हेंबरपासून राज्यातील ९ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाने घाट घातला आहे. यासाठी तालुक्यातील २६१ शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत दिल्लीत कोरोना आजाराने लोक बेजार झाले आहेत तर राज्यातही काही केल्या प्रकोप थांबत नसून अशा परिस्थितीत शाळा सुरू झाल्या तर कोरोनासह अनेक साथरोगांना सामोरे जावे लागणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी असे नियोजन असले तरी शाळेत वावरणारे विद्यार्थी या ना त्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात येतच असतात, लघुशंका, जेवणाच्या सुटीत, वर्गात आणि वर्गाबाहेर ते कितीतरी वेळा एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून राज्य जोपर्यंत संपूर्ण कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे शासनाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
अनेक शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग खोल्या व विद्यार्थी संख्या लक्षात घेता एरवी एका बाकावर तीन-तीन बसणारे विद्यार्थी यापुढे एका बाकावर एक बसणार असल्याने विद्यार्थी संख्येच्या आधारावर हिशोब केला तर हे गणित चुकीचे असल्याचा दावा अनेकांनी केला असून, एक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण आपले पाल्य शाळेत पाठविणार नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी एकमेच्या मोठ्या प्रमाणात संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय, त्याची हमी कोण घेणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळा सुरू करून विद्यार्थी एकत्र आले तर कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक गतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अनेक शाळांकडे विद्यार्थी बसण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत, शाळेत शिक्षकताना काहीही केले तरी विद्यार्थी एकत्र येणार, एकमेकांचे साहित्य हाताळणार, सहभोजन एकत्र येऊन करणार, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे आवर्जून लक्ष ठेवत राहणे ही बाब शिक्षकांना अशक्यप्राय आहे. राज्यातील परिस्थिती निवडल्यावर शाळा सुरू करायला हरकत नाही परंतु आता शाळा सुरू करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सद्यस्थितीत कोरोना परिस्थिती नियंत्रणात नसताना शाळ सुरू करणे ही अत्यंत चुकीची आणि दुर्दैवाची बाब आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर शाळेला आरोपी व्हावे लागेल, तूर्त मुलांना शाळेत बसविणे योग्य नाही, यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही जीव टांगणीला लागला आहे.
- डॉ. श्रीकांत तिडके, शिक्षण तज्ज्ञ, मूर्तिजापूर
सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसताना पाल्यांना शाळेत पाठविणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही. कोरोना प्रादुर्भावाचा प्रभाव असताना पाल्यांना शाळेत अथवा महाविद्यालयात पाठविणे ही बाब चिंताजनक आहे. पाल्याचे एक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण जाणीवपूर्वक त्यांचा जीव धोक्यात घालणार नाही.
- विनायक थेटे, पालक, सिरसो