- संतोष येलकर
अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून (नरेगा) राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी भाैतिक विकासासाठी विविध १३ प्रकारची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, यासंदर्भात शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागामार्फत १ डिसेंबर रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
राज्यातील बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळांचा परिसर सुंदर असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्याचा भाैतिक विकास करण्यासाठी रोहयो अंतर्गत काही कामे उपयुक्त ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि अंगणवाड्यांचा भाैतिक विकास करण्यासाठी विविध १३ प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. यासंदर्भात शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागामार्फत शासन परिपत्रक १ डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
जि.प. शाळा व अंगणवाड्यांच्या भाैतिक विकासाची अशी आहेत कामे!
जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांचा भाैतिक विकास करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत विविध १३ प्रकारची कामे करता येणार आहेत. त्यामध्ये शाळेसाठी किचनशेड, शाळा, अंगणवाडी इमारतीसाठी रेन वाॅटर हार्वेस्टिंग संरचना, शाळा व अंगणवाडीच्या परिसरात शोषखड्डा, शाळा, अंगणवाडीसाठी शाैचालय, खेळाचे मैदान, शाळा, अंगणवाडीला संरक्षक भिंत, वृक्ष लागवड (बिहार पॅटर्न) , आवश्यकतेनुसार शाळा व अंगणवाडीच्या परिसरात पेविंग ब्लाॅक, काॅंंक्रिट नाली बांधकाम, रस्ते गुणवत्तापूर्ण करणे, बोअरवेलचे पुनर्भरण, गांडूळ खत प्रकल्प व नाडेप कंपोस्ट इत्यादी कामांचा समावेश आहे.