लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नैसर्गिक आपत्तीच्या काळात मानवी जीव, वित्ताच्या बचावासाठी केल्या जाणार्या उपायांची रंगीत तालीम आता जिल्हय़ातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतींमध्ये केल्या जाणार आहेत. त्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आपत्ती व धोके निवारण दिन साजरा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. यादरम्यान सप्ताह राबवून विविध उपक्रमही राबवण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत भूकंप, आग, पूर यासारख्या आपत्तींना जगभरातील मोठय़ा संख्येला सामोरे जावे लागत आहे. या आपत्तीमध्ये प्रचंड प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी होते. ती वाचवण्यासोबत त्यापासून बचाव करणे, आपत्तीच्या काळात मदतकार्य राबवण्याची गरज आहे; मात्र माहितीअभावी मदतकार्य राबवणेच अवघड होते, तर कधी-कधी मदतकार्य राबवणार्यांनाही आपत्तीचा फटका बसतो. त्यावर उपाय म्हणून आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजना, बचावाच्या पद्धती याबाबतची माहिती, प्रशिक्षण देणे काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी राज्य शासनाने ९ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना आदेश देत उपक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले. आपत्ती व धोके निवारण दिवस राज्यात प्रथमच साजरा केला जात आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यानच्या कालावधीत आपत्ती व धोके निवारण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याशिवाय, जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्याचे कार्यक्रमही घेण्याचे सांगितले आहे. यादरम्यान शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यास परीक्षेनंतरच्या काळात ते उपक्रम राबवण्यात येतील.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणीपंचायतराज संस्थेंतर्गत सर्वच कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५ मधील कलम ४0 नुसार सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, क्षमता बांधणी करणे, वार्षिक आढावा घेणे, याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक आपत्ती निवारण दिनसंयुक्त राष्ट्रसंघाने १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक आपत्ती व धोके निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे. चालू वर्षापासून महाराष्ट्रातही हा दिवस साजरा करण्याचे शासनाने ठरवले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्येही उपक्रमपंचायतराज संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या विविध कार्यालयांमध्येही आपत्ती निवारणाच्या रंगीत तालीमसोबत जागरूकता कार्यक्रम राबवण्याचे शासनाने बजावले आहे.