अकोला: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साधन साहित्याचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास, विज्ञानातील प्रयोगाचे प्रत्यक्ष अनुभव घेणे अशक्य आहे. या परिस्थितीचा विचार करता लगतच्या खासगी शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध असल्यास त्याचा वापर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही करता येईल, यासाठी शाळांचे टिष्ट्वनिंग (जोडशाळा) करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू झाले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी टास्क फोर्सचे गठन केले आहे. या फोर्सची आढावा सभा २ मे रोजी पार पडली. या सभेत शैक्षणिक सुधारणेसंदर्भातील मुद्यांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, त्या उपाययोजनांची जबाबदारीही संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर देण्यात आली. जिल्हा प्रशिक्षण व शैक्षणिक संस्था त्यावर काम करणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साधन साहित्याचा प्रचंड अभाव आहे. तसेच अभ्यासपूरक साहित्य उपलब्ध नसल्याने विषय समजून घेण्यातही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. त्या तुलनेत खासगी शाळांमध्ये आवश्यक साहित्य संगणक, विज्ञानातील प्रयोग साहित्य उपलब्ध ठेवले जाते. त्याचा लाभ त्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळतो. त्याचवेळी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी वंचित असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही ते साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील खासगी शाळांच्या ठिकाणानुसार जिल्हा परिषद शाळांसोबत जोडल्या जाणार आहे. खासगी आणि जिल्हा परिषद शाळेतील अंतरानुसार या शाळा जोडल्या जाणार आहेत. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी शाळांच्या माहितीनुसार नियोजन करत आहेत. लवकरच त्या नियोजनाला मंजुरी दिली जाणार आहे.- संगणक साहित्य, विचारांचेही आदानप्रदान होणारखासगी शाळांमध्ये उपलब्ध असलेले संगणक, इतर साहित्याचा उपयोग शैक्षणिक कामासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना करू दिला जाणार आहे. सोबतच खासगी शाळांतील नवनवीन संकल्पना, विचारांचे आदानप्रदानही जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसोबत केले जाणार आहे. त्यासाठी शाळांची जोडणी लवकरच होणार आहे.- टास्क फोर्स करणार ही कामेटास्क फोर्सकडे दिलेल्या कामांमध्ये विविध मुद्यांचे नियोजन आहे. त्यामध्ये विषय शिक्षक वर्गनिहाय संपर्क यादी तयार करणे, साप्ताहिक शैक्षणिक आराखडा तयार करणे, मासिक प्रश्नपत्रिकेसाठी सराव प्रश्नपत्रिका तयार करणे, ही कामेही टास्क फोर्स करणार आहे.