राम देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिल्ली (सफदरगंज) रेल्वेस्थानकावरून १७ फेब्रुवारी रोजी ‘सायन्स एक्स्प्रेस’ देशभ्रमंतीला निघाली आहे. वातावरणातील बदलाची माहिती देण्यासाठी निघालेल्या या विशेष गाडीला देशातील ६८ रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात आला आहे; मात्र या यादीतून ‘मॉडेल’ म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वेस्थानकास वगळण्यात आले आहे. मॉडेल स्टेशन वगळून मूर्तिजापूरसारख्या तालुकास्तरीय रेल्वेस्थानकावर तिला २७ ते २९ जुलै थांबा देण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अकोला हे शहर पूर्वीपासून व्यापारी दृष्टिकोनातून नावाजलेले आहे. कृषी विद्यापीठ तसेच अनेक शाळा व महाविद्यालय असलेल्या या शहरात विविध ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षणानिमित्त येतात. शिक्षणाचे हब म्हणून नावारूपास आलेल्या अकोला शहराच्या रेल्वेस्थानकाला ‘मॉडेल’ रेल्वेस्थानकाचा दर्जा लाभला आहे. बदलते वातावरण आणि जागतिक हवामानाची माहिती शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व इतर सर्वसामान्य नागरिकांना करून देण्याच्या दृष्टिकोनातून डिपार्टमेंट आॅफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने २00७ पासून १६ डब्यांच्या ‘सायन्स एक्स्प्रेस’चा श्रीगणेशा करण्यात आला. जास्तीत जास्त नागरिकांना पाहता यावे या दृष्टिकोनातून हे चालते-फिरते वैज्ञानिक प्रदर्शन दरवर्षी देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर थांबविले जाते. १४ जुलै रोजी रत्नागिरीमार्गे राज्यात दाखल झालेल्या या गाडीला २७ ते २९ जुलैदरम्यान मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे. वास्तविक पाहता अकोल्यासह आसपासच्या अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी ओढा अकोल्याकडेच अधिक असतो. मूर्तिजापूरसारख्या तालुकास्तरीय रेल्वेस्थानकाऐवजी ‘मॉडेल’ रेल्वेस्थानक म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर ‘सायन्स एक्स्प्रेस’ला थांबा दिल्यास त्यास जास्तीत जास्त प्रतिसाद लाभू शकतो. यासाठी लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रवासी संघ आणि सामाजिक संघटनांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील.
‘सायन्स एक्स्प्रेस’ला हवा अकोल्यात थांबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:30 AM