अकोला: गतवर्षीप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी दहावीचे निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सोमवारी रालतो विज्ञान महाविद्यालयात झालेल्या माध्यमिक शिक्षण विभाग व मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी विज्ञान शाखेच्या आठ हजार जागा उपलब्ध असून, कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे बैठकीत शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी स्पष्ट केले.बैठकीला रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, आरडीजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र व्यास, सुधाकर नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांकडून आर्थिक लूट केल्या जात होती. याला चाप बसावा म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाने गतवर्षी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली होती. यंदाही ही प्रक्रिया राबवावी, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी मार्गदर्शन केले. सहायक शिक्षण उप-निरीक्षक आत्माराम राठोड यांनी, केंद्रीय प्रवेश पद्धतीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ११ वीच्या सर्व शाखेच्या प्रवेशाचा विचार करावा लागणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव गजानन चौधरी यांनी, प्रवेश समितीच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना माफक शुल्कामध्ये प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांनी विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यावेळी विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांनी, ही प्रक्रिया राबविताना, स्वयंसहाय्यीतच्या स्पर्धेत अनुदानित महाविद्यालय टिकले पाहिजे, याचा विचार व्हावा, असे मत व्यक्त केले. बैठकीला प्रवेश प्रक्रिया समितीचे प्रेमकुमार सानप, पुरुषोत्तम लांडे, विलास अत्रे, आनंद साधू, प्रा. संजय देशमुख, प्रा. प्रवीण ढोणे, प्रा. प्रकाश डवले यांच्यासह प्राचार्य व मुख्याध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी केले. (प्रतिनिधी)