अकोला: भारत स्काऊट आणि गाईडच्या भाऊसाहेब तिरुख विद्यालय खिरपुरी बु. ता.बाळापूर येथे सुरू असलेल्या चार दिवसीय जिल्हा मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत एक हजार स्काऊट गाईड, कब बुलबुलनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होऊन भारताच्या सांस्कृतिक विविधतेतून एकतेचे दर्शन घडविले. भारताची लोकसंस्कृती, विविध समुदाय विकास कार्यक्रम, वारकरी दिंडी, स्वच्छ भारत अभियान, मतदार जनजागृती, महापुरुष व समाज सुधारकांची झलक पाहायला मिळाली.बुधवारी स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचा समारोप खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सनदी अधिकारी तथा भारत स्काऊट गाईडचे राज्य मुख्य आयुक्त भा. ई. नगराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य शत्रुघ्न बिरकड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाऊसाहेब तिरुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बिनभांड्याचा स्वयंपाक, शारिरीक प्रात्यक्षिके, गॅझेटस स्पर्धा, शोभायात्रा व शेकोटी असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. (प्रतिनिधी)