अकोला - सिंधी कॅम्पजवळील आदर्श कॉलनीतील खदानीमध्ये एका युवकाने आत्महत्या केल्याच्या माहितीवरून पिंजर येथील गाडगे बाबा आपत्कालीन शोध पथकाकडून शुक्रवारपासून सर्च आॅपरेशन राबवण्यात येत आहे. गत दोन दिवसांपासून शोध घेण्यात येत असला तरीही शनिवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह आढळला नाही.सिंधी कॅम्पमधील एका युवकाने खदानमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती खदान पोलिसांनी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली होती. पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश तायडे, धीरज राऊत, गोकुळ तायडे, धीरज आटेकर, अंकुश सदाफळे, सचिन बंड, गोविंदा ढोके, महेश साबळे, मयूर जवक हे आपत्कालीन वाहनासह आणि शोध व बचाव साहित्यासह सर्च आॅपरेशनकरिता १ मार्चला रात्री सहा वाजता घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोध सुरू केला; मात्र मृतदेह सापडला नाही. शनिवारी सकाळी पुन्हा सहा वाजतापासून सर्च आॅपरेशन सुरू केले आहे, तरीही मृतदेहाचा शोध लागलेला नाही. खदान पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने त्यात ७० फुटाच्या वर पाणी आणि झाडेझुडुपे व काडीकचरा आहे. त्यामुळे सर्च आॅपरेशन दरम्यान मोठे अडथळे निर्माण होत आहेत. नातेवाइकांच्या भावना लक्षात घेऊन अशा अडथळ्यांना न घाबरता सर्च आॅपरेशन सुरूच ठेवणार असल्याचे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले.