अकोला: बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत १ ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभेमध्ये निर्देश दिले. त्यानुसार सर्व विभागामार्फत विविध वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही शाळाबह्य किंवा स्थलांतरीत मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीमेंतर्गत ३ ते ६ वर्ष वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत, तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये जात नाहीत, व ६ ते १७ वर्ष वयोगाटातील शाळाबाह्य बालकांची शोधमोहिम घेण्यात येणार आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर समित्यांचे गठन करण्यात आले आहे.
या विभागांचा राहणार सहभाग
शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहीम उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास , एकात्मिक बालविकास योजना, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे.