अकोला : काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. शेतकरी बियाणांची खरेदी करीत आहे; मात्र शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे उपलब्ध होत नाही. वितरकाकडून बियाणे नसल्याचे सांगण्यात येत असून, अधिकारी वितरकांना बियाणे देण्यात आल्याचे सांगत आहेत. या चालढकल धोरणात शेतकरी मात्र बियाण्यांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बियाण्यांचे गौडबंगाल होत असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचकडून करण्यात आला. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषिमंत्र्यांनी महाबीजला सोयाबीन बियाण्यांचे दर न वाढविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार २२५० रुपये एका बॅगची किंमत ठरविण्यात आली आहे. उर्वरित खासगी कंपन्यांचे बियाणे अधिक दराने मिळत आहे. त्यामुळे महाबीजचे बियाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे; परंतु शहरात नेमलेल्या महाबीजच्या वितरकांकडे विचारणा केल्यास बियाणे नसल्याचे सांगण्यात आले. एका वितरकाने तर बियाणे संपले, आले तर देऊ, असे म्हटल्याचे शेतकरी जागर मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे बियाणे शेतकऱ्यांना न देता डीलर स्वत: दडवून ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी अर्धवट माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी जागर मंचचे संयोजक कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे उपस्थित होते.
हंगाम तोंडावर; शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:19 AM