जिल्ह्यात रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे मका पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शासनाने मका खरेदीसाठी १८५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे; मात्र खुल्या बाजारात १२००-१४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. जिल्ह्यातील सहा केंद्रांवर ५४९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे; मात्र अद्यापही नाफेडने खरेदी सुरू केली नाही. खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. काही शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कमी भावाने मका विकाला लागला. अद्यापही काही शेतकरी हमीभावाने मका खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहे. शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत असून खरेदी कधी सुरू करणार, अशी विचारणा करताना दिसत आहेत.
बाजारापेक्षा हमीदर चांगला
बाजार समितीत मका खरेदीला १२००-१४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर हमीभावाने १८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. बाजारापेक्षा जास्त दर हमीभाव खरेदी केंद्रावर मिळत आहे; मात्र अद्यापही खरेदी सुरू झालेली नाही.
असे आहे केंद्र
अकोला, अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, तेल्हारा व पातूर येथील मका खरेदी केंद्रांवर नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबाइलवर संदेशही पाठविण्यात आले आहेत.