अकोला: अल्प पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, उत्पादनातही घट आली आहे. त्यामुळे बाजार समितीत येणार्या सोयाबीनची आवक ऐन हंगामातच मंदावली आहे. गत आठ दिवसांपासून ७ ते ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असून, अकोला बाजार समितीत ८६ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात पाऊस दोन महिने उशिरा झाला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्याने मूग आणि उडीद ही पिके शेतकर्यांच्या हातून गेली. त्यामुळे शेतकर्यांना सोयाबीन पिकापासून आशा होती. पाऊस उशिरा झाल्यामुळे यावर्षी उत्पादन कमी होईल, असा अंदाज शेती तज्ज्ञ जुलै महिन्यातच व्यक्त करीत होते. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही मुबलक पाऊस झाला नसल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी अनेक शेतकर्यांनी सोयाबीनची काढणीच केली नाही. त्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवातीपासूनच आवक कमी होती. दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनची तीन ते चार क्विंटल आवक होती. तर दिवाळीनंतर आवक थोड्या प्रमाणात वाढली. नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वत्रच सोयाबीनची काढणी होते. त्यामुळे यावेळी दररोज १५ ते २0 हजार क्विंटल आवक असते. मात्र, सध्या केवळ सात ते आठ हजार क्विंटलची आवक होत आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन अध्र्यापेक्षाही कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या शेतात शेतकरी सोयाबीन पिकाची काढणी करीत आहेत. मात्र, काही शेतकर्यांनी उत्पन्न अत्यल्प झाल्यामुळे सोयाबीन न काढताच शेतात नांगरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश भागातील सोयाबनीची काढणी झाली असून, विक्रीही झाली आहे.
ऐन हंगामात सोयाबीनची आवक मंदावली
By admin | Published: November 09, 2014 12:24 AM