बाश्रीटाकळी ( जि. अकोला) : बाश्रीटाकळी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या २0 सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत माजी जि.प.सदस्य सुनील धाबेकर व जिल्हा बँकेचे संचालक दामोदर काकड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघर्ष समितीने संचालक मंडळाच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवून प्रतिस्पर्धी आ.हरीश पिंपळे सर्मथकांच्या बहुजन शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत बहुजन शेतकरी पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या निवडणुकीत बाजार समिती संचालकांच्या १८ जागांसाठी माजी जि.प.सदस्य सुनील धाबेकर व जिल्हा बँकेचे संचालक दामोदर काकड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघर्ष समिती व आ.हरीश पिंपळे सर्मथकांचे बहुजन शेतकरी पॅनल हे दोन पॅनल समोरासमोर उभे ठाकले होते. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील संचालकांच्या ११ जागांसाठी ८९१ मतदारांनी, तर ग्रामपंचायत मतदारसंघातील ३ जागांसाठी ५८४, तर व्यापारी व हमाल मतदारसंघातील ३ जागांसाठी १७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीची मतमोजणी २१ सप्टेंबर रोजी येथील गुलाम नबी महाविद्यालयात करण्यात आली. त्यात धाबेकर-काकड यांच्या शेतकरी संघर्ष समितीने संचालकांच्या सर्व १८ जागांवर दणदणीत मतांनी विजय संपादन केला. यात सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून दिगांबर ठाकरे ५४५ मते, तुकाराम जाधव-५३१, तुळसाबाई ठाकरे-५२७, बाबाराव नानोटे-५३२, देवीदास नानोटे-५२७, रोहीदास राठोड-४७८, रमेश वानखडे-४८७ मते मिळवून विजयी झाले. सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघातून मंदा देशमुख-५३२, ललिताबाई शेंडे-५४0 मते प्राप्त करून जिंकल्या. सेवा सहकारी संस्था इतर मागास वर्ग मतदारसंघात विवेक गावंडे -५५0, तर भटक्या व विमुक्त जाती संस्था मतदारसंघात अरविंद जाधव-५५५ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघातून लीलाबाई कोहर-३३५ व प्रवीण महल्ले ३२६ मते, तर ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघातून प्रकाश वाहूरवाघ हे ३३८ मते प्राप्त करून विजयी झाले.
बाश्रीटाकळी कृउबास निवडणुकीत शेतकरी संघर्ष समितीचा विजय
By admin | Published: September 22, 2015 1:35 AM