अकोला - उमरी येथील रहिवासी प्रिया महाजनपासून सुटका करून घेण्यासाठी तिच्या हरीहर पेठेतील रहिवासी प्रियकराने तिचा गळा दाबून नंतर तिच्यावर रॉकेल ओतून जाळून मारले होते. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीस मंगळवारी जुने शहर पोलिसांनी ताब्यात घेउन अमरावती जिल्हयातील शिरपूर पोलीसांच्या हवाली केले.प्रिया ललित महाजन (वय २२,माहेरचे नाव प्रिया गजानन मोरे रा. आवस्ती लेआऊट मोठी उमरी) हिचा मृतदेह ओळखता येणार नाही अशा जळालेल्या अवस्थेत मोर्शी रोडवरील निंबीगावाजवळ रस्त्याच्या कडेला एका मोरीच्या पाईपमध्ये २६ एप्रिल रोजी दिसून आला होता. या प्रकरणी अमरावती ग्रामीण मधील शिरखेड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानीक गुन्हे शाखेच्या तपासात हरिहरपेठेतील २३ वर्षीय सागर उर्फ प्रेम दीपक बरगट याचे संबंध असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याचे मोबाइलचे सीडीआर काढला असता त्यात मृतक महिलेसोबत त्याचे संभाषण झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखवीताच त्यानेच महिलेचा गळा दाबून व तिच्या मानेवर काचेने वार करून खून केला व तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळून टाकल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी आरोपी प्रेमला मदत करणारा अमर प्रभाकर भगत याच्या शोधासाठी शिरपूर पोलीस मंगळवारी अकोल्यात आले होते. जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अन्वर शेख यांच्या पथकाने अमर भगत याला पकडले व शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
प्रिया महाजन हत्याकांडातील दुसरा आरोपी शिरपूर पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:25 PM