अकोला : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संवादामुळे शनिवारी रात्री निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सलग दूसऱ्या दिवशीही जुन्या शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला, बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे.
जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास दोन गटांत दगडफेक व हाणामारीची घटना घडली. दोन्ही बाजूंकडील गट एकमेकांवर चालून गेल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करून काही घरांना आग लावली त्यामुळे शनिवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी नीमा अराेरा यांनी संचारबंदी लागू केल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेक व तोडफोडीमध्ये एक व्यक्ती ठार झाला तर सहा जण जखमी झाले. यात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. दरम्यान रविवारी सर्व पक्षाच्या लाेकप्रतिनिधींनी शांतता बैठकीत घटनेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांनी अकाेल्यातील नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला.
राजेश्वर मंदिर बंदअकाेल्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर मंदिरात दर साेमवारी भक्तांची माेठी गर्दी असते मंदिर परिसर हा संचारबंदी भागात येत असल्याने शनिवार रात्रीपासून मंदिर बंद आहे त्यामुळे अनेक भाविकांना आज दर्शन घेता आले नाही