अकोला : तालुक्यातील दहीहंडा येथील रुपनाथ महाराज संस्थान येथे तब्बल ३२१ किलो वजनाची अजस्त्र घंटा स्थापित करण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे गणेश पोटे यांनी सोमवारी येथे दिली. अयोध्या येथील राम मंदिरानंतर आकार वजनात ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी घंटा असल्याचा दावा पोटे यांनी यावेळी केला.शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत या घंटेबाबत माहीत देताना पोटे म्हणाले की, ही घंटा उत्तर प्रदेशातील जनेश्वर येथे तयार करण्यात आली आहे. चांदी, जस्त, साउंड पावडर, कासे, तांबे आदी धातूंनी बनविलेल्या या घंटेचे वजन ३२१ किलो आहे. या घंटेसाठी ३ लाख ५० हजार रुपये खर्च आला असल्याचेही पोटे यांनी सांगितले. अयोध्या येथील राम मंदिरात ६२१ किलो वजनाची घंटा देशातील सर्वात मोठी असून, त्यानंतरची दुसरी सर्वात मोठी घंटा दहिहंडा येथील रुपनाथ मंदिरासाठी तयार करण्यात आल्याचे पोटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आशिष मगर,प्यारेलाल जयस्वाल आदी उपस्थित होते.
३ किमीपर्यंत घुमणार ध्वनी
या अजस्त्र घंटेची किमया म्हणजे या घंटेमधून ओंकार हा ध्वनी निर्माण होऊन तो तब्बल ३ किमी पर्यंत ऐकू येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही घंटा थेट रुपनाथ महाराज संस्थानमध्ये नेण्यात येत असून तेथे आरती व पुजा अर्चनेने या घंट्याची स्थापना करण्यात येणार आहे.