अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत उर्वरित २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी लॉटरीची राज्यस्तरीय दुसरी सोडत शनिवारी काढण्यात आली. या सोडतीदरम्यान आॅनलाइन अर्ज केलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेशासंदर्भात सोमवारपासून पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. सोबतच एसएमएस न आलेल्या पालकांनी, संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा क्रमांक टाकून खात्री करावी.जिल्ह्यात आरटीई नोंदणीकृत २0७ शाळा आहेत. या शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २,३७५ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या जागांवर पाल्यांच्या प्रवेशासाठी ६ हजार ४१४ पालकांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १,८६५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यापैकी केवळ १,३९0 विद्यार्थ्यांचे राखीव जागांवर प्रवेश झाले आहेत. लॉटरी पद्धतीने घेतलेल्या सोडतीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात १,८६५ पाल्यांची इंग्रजी शाळांमधील प्रवेशासाठी निवड करून त्यांची आॅनलाइन यादीसुद्धा प्रकाशित केली होती. आता दुसºया टप्प्यातील राज्यस्तरीय सोडत शनिवारी काढण्यात आली. दुसºया सोडतीदरम्यान ६९३ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. या सर्व पालकांना सोमवारपासून प्रवेशाचे एमएसएस पाठविण्यात येत आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी एसएमएस मिळाल्यावर आवश्यक कागदपत्रांची नियुक्त केलेल्या समितीकडून पडताळणी करून घ्यावी आणि शाळांमधील राखीव जागांवर प्रवेश घ्यावा. प्रवेश न घेतल्यास प्रवेश आपोआप रद्द होईल. (प्रतिनिधी)