अकोला: राज्य साहित्य व संस्कृती मंडळ प्रस्तुत वºहाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था लोणी, शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने दुसरे वºहाड लोककला साहित्य संमेलन १0 आॅक्टोबर रोजी शिवाजी महाविद्यालयात होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार न. चि. अपामार्जने राहतील. उद्घाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मनोज तायडे राहतील तर स्वागताध्यक्ष केशवराव मेतकर राहतील, अशी माहिती संस्थाध्यक्ष डॉ. रावसाहेब काळे यांनी शनिवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली.संमेलनाच्या पहिले सत्रात बोलीभाषा, लोककला आणि संस्कृती विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भाषा अभ्यासक डॉ. केशव तुपे राहतील. शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य दिलीप जोशी, फरझाना डांगे, डॉ. अलका नाईक हे परिसंवादात उपस्थित राहतील. लोप पावत असलेल्या लोककलांचे जतन व्हावे, यासाठी दुसऱ्या सत्रात विठ्ठल भजन मंडळाचे वारकरी भजन, जय मुठवा बाबा सांस्कृतिक मंचाचे कोरकू लोकनृत्य, मुंगसाजी महाराज भजन मंडळाचे एकतारी भजन, महिला मंडळ कौलखेडचे जात्यावरील गाणी, जय भवानी मंडळ, वासुदेवाचे गाणे व गोंधळ, अवधुती भजन मंडळ भौरदचे अवधुती भजन यासह इतर मंडळांच्यावतीने लोककलांचे सादरीकरण होणार आहे. वºहाडातील लोकसंस्कृतीचे आणि या लोकसंस्कृतीला चित्रात कसे रेखाटता येते, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी चित्र प्रदर्शन राहील. प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांची पारंपरिक चित्रे, प्रसिद्ध चित्रकार सतीश पिंपळे यांची आधुनिक चित्रकला या प्रदर्शनात राहील, अशी माहितीही डॉ. रावसाहेब काळे यांनी दिली. संमेलनाच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे उपस्थित राहतील. तसेच राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. शंकर धडके, अशोक राणे, फरझाना डांगे उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रा. डॉ. संजय खडक्कार, प्रा. श्रद्धा थोरात, प्रा. संजय पोहरे व प्रा. प्रवीण वाघमारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)