अकोला: फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घालण्यास सुरुवात केली असून आतापर्यंतची सर्वात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी रक्तसंकलनात मोठी घट झाली आहे. सद्यस्थितीत तुलनेने रक्ताची मागणी कमी असली, तरी अत्यावश्यक उपचारासाठी रक्ताची गरज भासत आहे. विशेषत: सिकलसेल, थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त रुग्णांची मोठ्या प्रमाणात होरपळ होताना दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्टोबर नंतर परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरूवात झाल्याने रक्तदान शिबिरे, सार्वजनिक कार्यक्रम आदींवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात शासकीय रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांची संख्या कमी असली तरी प्रसूती, अपघात आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया तसेच थॅलेसिमिया आणि सिकलसेल या रुग्णांना रक्ताची गरज भासतच आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदात्यांशी संपर्क करून किंवा नातेवाईकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करून रक्ताची गरज भागविली जात आहे, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे डॉक्टर सांगतात.
रक्ताशी निगडित आजारी जिल्हानिहाय रुग्ण
जिल्हा सिकलसेल - थॅलेसेमिया -हिमोफिलिया
अकोला - १०३ - ३१ - ४२
अमरावती - ४६ - १५ - २०
बुलडाणा - ०४ - १०४ - ०६
वाशिम - ०२ - ७५ - ०४
यवतमाळ - ४१ - १३ - ००
एकूण - १९६ - २३८ -७२
निगेटिव्हसह पॉझिटिव्ह रक्तगटही उपलब्ध नाही
जिल्ह्यात आठ प्रमुख रक्तपेढ्या असून, यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. प्रामुख्याने एबी पॉझिटिव्ह, एबी निगेटिव्ह या गटातील रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गत महिनाभरात क्वचितच रक्तसंकलन झाल्याने ही स्थिती ओढवली आहे.