अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते गुजरात राज्यातील भावनगरदरम्यान १९ जुलैपासून साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या अप व डाउन अशा प्रत्येकी चार फेऱ्या होणार असून, अकोला रेल्वेस्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, सिंकदराबाद-भावनगर विशेष एक्स्प्रेस १९ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत दर शुक्रवारी सिकंदराबाद स्थानकावरून रात्री २०:०० वाजता रवाना होऊन रविवारी पहाटे ०५:५५ वाजता भावनगर स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात भावनगर-सिकंदराबाद विशेष एक्स्प्रेस २१ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत दर रविवारी भावनगर स्थानकावरून सकाळी १०:१५ वाजता रवाना होऊन सोमवारी १५:४५ वाजता सिकंदराबाद स्थानकावर पोहोचणार आहे.