अकोला: डॉक्टरांवरील हल्ले पाहता सर्वोपचार रुग्णालयाला सुरक्षा कवच म्हणून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे डॉक्टरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता; परंतु दोन दिवसांपूर्वी येथे एका रुग्णाने महिला डॉक्टरवर हल्ला केला, तेव्हा येथील सुरक्षा रक्षकांनी बघ्याची भूमिका घेतली होती.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मागील काही वर्षांपूर्वी डॉक्टरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. शिवाय, वाढत्या रुग्णांसोबत त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाइकांची संख्या पाहता तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाचे जवान येथे तैनात करण्यात आले होते. त्यामुळे डॉक्टरांवरील हल्ल्यांना आळा बसला; परंतु सुरुवातीच्या दोन वर्षानंतर सुरक्षा रक्षकांचा दबदबाही कमी झाला. याची प्रचिती दोन दिवसांपूर्वी सर्वोपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये एका रुग्णाने महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर हल्ला चढविल्यानंतर आली. महिला डॉक्टरवर रुग्णाचा हल्ला झाल्यानंतर डॉक्टरने मदतीची हाक मारली; परंतु त्या ठिकाणी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणानंतर येथील सुरक्षा रक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.डॉक्टरांमध्ये पुन्हा असुरक्षिततेची भावनासुरक्षा रक्षकाच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्यानंतर डॉक्टरांमध्ये पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. या घटनेमुळे सर्वोपचारमधील सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत करण्याची गरज आहे.रुग्णांच्या नातेवाइकांवर हवा वचकसुरक्षा रक्षकांच्या तैनातीनंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षा रक्षकांचा प्रत्येक वॉर्डात एक फेरी व्हायची. अस्वच्छता करणाऱ्यांनादेखील त्यांचा धाक होता; परंतु मागील काही महिन्यांपासून त्यांचा वचक कमी झाल्याने अनेकांना मनमानी करणे सोयीचे झाले आहे.