लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे सुरक्षा कवच आता आणखी मजबूत झाले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ५१ सुरक्षारक्षक आणि चार निरीक्षक सोमवार, ३ जुलैपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय परिसरात विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचारचा परिसर मोठा असून, या परिसरात जुन्या आणि नव्या अशा एकूण २८ इमारती आहेत. एवढा अवाढव्य पसारा असताना, त्या तुलनेत सुरक्षारक्षकांची संख्या मात्र तोकडी होती. यापूर्वी ‘मेस्को’ आणि स्थानिक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी होती. पसारा मोठा असल्याने सुरक्षारक्षक प्रत्येक ठिकाणी तैनात करणे शक्य नव्हते. यामुळे असामाजिक तत्त्वांचा वावर, चोऱ्या यासारखे प्रकार वाढले आहेत. डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वादविवादाच्या किरकोळ घटनाही कधी-कधी समोर येतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपलब्ध सुरक्षा यंत्रणा तोकडी पडत होती. आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ५१ सुरक्षारक्षक आणि चार निरीक्षकांची तुकडी शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेत दाखल झाली आहे. या तुकडीचे जवान विविध ठिकाणी तीन पाळ्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये सहा सुरक्षारक्षक हे सशस्त्र आहेत. या सुरक्षारक्षकांना पोलिसांसारखेच अधिकार असल्याने सर्वोपचारच्या सुरक्षेत नक्कीच भर पडली आहे. लवकरच महिला सुरक्षारक्षकही येणार!पहिल्या टप्प्यात ५१ सुरक्षारक्षक दाखल झाले असून, ते विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.आता दुसऱ्या टप्प्यात लवकरच १३ महिला सुरक्षारक्षक सर्वोपचार रुग्णालयात विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘सर्वोपचार’मध्ये सुरक्षारक्षक तैनात
By admin | Published: July 06, 2017 1:25 AM