‘स्वच्छ सर्वेक्षण’ला खाे!
अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्यक्षात परिस्थिती भिन्न असून, शहराच्या कानाकाेपऱ्यात घाणीचे ढीग साचल्याचे दिसून येतात. ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०२१’अंतर्गत शहरातील स्वच्छतेच्या कामांची प्रत्यक्षात तपासणी करणे अपेक्षित असताना अद्यापही ‘क्यूसीआय’च्या चमुने पाहणी केली नसल्याचे समाेर आले आहे.
पंचायत समितीसमाेर वाहतुकीचा खाेळंबा
अकाेला : पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या दाेन्ही कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी राहते. पंचायत समिती ते मनपाच्या अग्निशमन विभाग कार्यालयापर्यंत मंगळवारी रस्त्याच्या दाेन्ही बाजूने दुचाकी वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा झाल्याचे पाहावयास मिळाले. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
काेराेनाचा प्रादुर्भाव, नागरिकांची पाठ
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानाही नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.
क्षयरुग्णांची माहिती जमा करण्याचे काम
अकाेला : शहरातून क्षयराेगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मनपाने कठाेर पावले उचलली आहेत. खासगी रुग्णालये, क्लिनिकमध्ये क्षयराेगांचा उपचार करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी क्षयराेग आढळून आलेल्या व्यक्तींची माहिती मनपाने दिलेल्या संकेतस्थळावर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मनपाच्या वैद्यकीय विभागात क्षयरुग्णांची माहिती अपडेट करण्याचे काम सुरू झाले आहे.
काेराेनाचा संसर्ग; मनपातर्फे जनजागृती
अकाेला : मागील काही दिवसांपासून शहरात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता, जनजागृतीसाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून, नागरिकांना दक्षता बाळगण्याचे सूचित केले जात आहे. मंगळवारी पश्चिम झाेनच्या वतीने माेहीम राबविण्यात आली. नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
नदीपात्रात फवारणी
अकाेला : माेर्णा नदीपात्रात तुंबलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास वाढली असून, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या परिसरात फवारणी करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक गिरीश जाेशी यांनी मनपाकडे केली हाेती. मंगळवारपासून हिवताप विभागाने नदीपात्रात फवारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
लसीकरणासाठी कस्तुरबामध्ये गर्दी
अकाेला: केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, महापालिका प्रशासनाने ३ मार्चपासून ६० वर्षांवरील वयाेवृद्ध नागरिक व दुर्धर आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी मनपाच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केल्याचे चित्र हाेते. यावेळी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष झाले हाेते.
चाचणी न केल्यास दुकानाला सील
अकोला : शहरातील व्यावसायिकांना दुकाने व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी अनिवार्य केली आहे. दुकान संचालक व दुकानांमधील सर्व कामगारांची काेराेना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल साेबत ठेवणे बंधनकारक आहे. अहवाल निगेटिव्ह नसल्यास किंवा चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानाला सील लावण्याचा इशारा मंगळवारी मनपाने दिला.