- सत्यशील सावरकरतेल्हारा : शासनाच्यावतीने वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक कार्यकर्ते संस्था, संघटनांच्या माध्यमातून खुल्या जागांवर, डोंगरांवर, रस्त्याच्या दुतर्फा, वृक्ष लागवड केली जाते. यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून सीड्स बॉल ही संकल्पना पुढे येत आहे. तेल्हारा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने सीड्स बॉल तयार करण्यात आले असून, त्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येणार आहे.उन्हाळ्याची सुटी म्हटली की, लहान मुले, महाविद्यालयीय विद्यार्थी शिबिरांसोबत स्पर्धेत सहभागी होतात. बाहेरगावी जातात; परंतु त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, तेल्हाऱ्यामध्ये झाडांच्या बिया संकलित करून आणि मातीच्या गोळ्यांमध्ये त्या टाकून त्याचे सीड्स बॉल तयार करण्याचे काम सामाजिक संस्था, संघटनांनी सुरू केले आहे. पावसाळ्यात सीड्स बॉलची नवी संकल्पना पर्यावरण जागृतीत मोलाची ठरू शकते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बियाण्यांना माती आणि शेणखताच्या साहाय्याने गोळे तयार करून सुरक्षित केले जाते. नंतर सीड्स बॉलचा उपयोग रस्ता दुतर्फा, मोकळे रान, टेकडी, मोकळी मैदाने आदी ठिकाणी रोपण करून हिरवळ वनराई तयार करता येऊ शकते. वृक्षांची बी संरक्षित गोळ्यात असल्याने पावसाळ्यात त्याच्यातील रोप बाहेर येण्यास मदत होते. आतापर्यंत जांभूळ, आंबा, सीताफळ, कडूलिंब आदी प्रकारातील झाडांच्या बिया साठवून त्या मोकळ्या मैदान अथवा टेकडीवर फेकल्या जात होत्या; मात्र त्यामुळे या बिया पावसामुळे वाहून जाण्याचा धोका होता. आता सीड्स बॉलमुळे या बिया वाहून न जाता मातीमुळे त्या जमिनीला घट्ट चिकटून राहतात. पाऊस आल्यानंतर या बिया वाहून न जाता उगविण्यास मदत होते. याआधी पायलट प्रोजेक्ट हाती घेऊन सीड्स बॉल तयार केले होते. ज्या ठिकाणी हे सीड बॉल फेकले होते, त्या ठिकाणी यातील बहुतांश झाडे जगविण्यात यश आले आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. या उपक्रमात लहान-मोठे सर्वांनी सहभागी व्हावे, ही काळाची गरज आहे. खेळत-खेळत नाते निसर्गाशी जोडले जावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचेही रक्षण होईल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने यात सहभाग घेतला जावा, अशी अक्षर मानव पर्यावरण संस्थांनी अपेक्षा केली आहे. सीड्स बॉल तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा!सीड्स बॉल तयार करण्याच्या उपक्रमात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक, सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, पत्रकार आदी विविध क्षेत्रात काम करणारे कामगार यांनी पुढाकार घ्यावा, तसेच सायकल ग्रुप, ट्रेकर ग्रुप, शाळा आणि महाविद्यालय, कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक वसाहती, शेतकरी हे सीड बॉल विविध ठिकाणी ठेवू शकतात.