अकोला: शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या विशेष पथकाने अन्न व औषधी प्रशासनाच्या सहकार्याने एमआयडीसी परिसरात एका ट्रकमधील तीन टाक्यांमधून सोयाबीन व पाम तेलाचा साठा जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली. सोयाबीन व पाम तेलाचा साठ्यामध्ये भेसळ असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जप्त केलेल्या तेलाची किंमत ५४ हजार रुपये आहे.शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या विशेष पथकाचे पीएसआय तुषार नेवारे यांना एमआयडीसीमध्ये भेसळयुक्त तेलाचा ट्रक जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी रविवारी सापळा रचला आणि ट्रक ताब्यात घेतला. तेलाच्या साठ्याचा ट्रक आनंद तेल भंडारचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांनी ट्रकमधील तीन टाक्यांमध्ये असलेले सोयाबीन व पाम तेलाचा साठा जप्त केला असून, या साठ्याची किंमत ५४ हजार रुपये आहे. या दोन्ही तेलांची भेसळ करून त्याची विक्री करण्यात येणार होती, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी तेलाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. या साठ्याबाबत कागदपत्रांचीसुद्धा तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)