अकोला : स्वस्त धान्य दुकानांतील तसेच गरिबांसाठी असलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असतानाच शहर पोलीस उप-अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सदर तांदळाचा ट्रक पातूर रोडवरील प्रभात किड्स शाळेजवळ पकडला. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली असून, तांदळासह तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी पातूरकडे नेण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस उप-अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख अमित डहारे यांना मिळाली. त्यांनी पथकासह प्रभात किड्स ते अमनदीप ढाबा दरम्यान नाकाबंदी करून अकोला येथून पातूरकडे जात असलेल्या तांदळाचा ट्रक पकडला. त्यानंतर चालक आणि वाहकाची चौकशी केली असता, हा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याकरिता नेण्यात येत असल्याची माहिती चालक व वाहक याने दिली. त्यानंतर पोलिसांनी हा तांदूळ घेऊन जाणारा सदाम खान शब्बीर खान रा. वाशिम बायपास, सय्यद यासीन सय्यद सैफुद्दीन रा. नवाबपुरा यांच्या मालकीचा असलेला अंदाजे १५ क्विंटल स्वस्त धन्य दुकानातील तांदूळ तसेच इतर मुद्देमाल असा एकूण ५ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर या आरोपींविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात कलम ३,७ जीवनावश्यक कायदा १९५५अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलीस उप-अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख अमित डहारे व त्यांच्या पथकाने केली.