अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णा नदीपात्रातून रेतीची विना रॉयल्टी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने पकडले. या ट्रॅक्टरसह सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंदुरा येथील रहिवासी ट्रॅक्टर चालक ऋषिकेश बोकशे वय २२ वर्षे हा तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णा नदीपात्रातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करून त्याची विक्री करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी ट्रॅक्टरचालक ऋषिकेश ट्रॅक्टर सोडून पळून गेला. या प्रकरणी ट्रॅक्टरचा मालक व चालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.