शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, उड्डाणपुलाखाली, तसेच वाहन दुरुस्तीच्या ठिकाणी भंगार, अनेक वर्षांपासून खितपत पडून असलेल्या बेवारस वाहनांमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा वाहनांना जप्त करण्यासाठी विशेष माेहीम राबविण्याचे निर्देश मार्च, २०२० मध्ये नगरविकास विभागाने जारी केले हाेते. त्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी वाहने जप्त करण्यासाठी पुढाकार घेतला. अशा वाहनांची उपप्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेकडे माहिती मागितली हाेती, तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्थ झाेनमधील बेवारस, तसेच भंगार वाहनांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले हाेते. सर्व साेपस्कार पार पाडल्यानंतर मनपाने प्रत्यक्षात कारवाईला प्रारंभ केला असता, ज्या भागात सर्वाधिक वाहने रस्त्यालगत पडून आहेत, त्या परिसराकडे पाठ फिरविण्यात आल्याने अकाेलेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
गाेरक्षण राेड भागात कारवाई
मनपाच्या अतिक्रमण विभागाने दक्षिण झोनअंतर्गत गौरक्षण रोड परिसरातील आर्य भट्ट कॉलोनी, घाटे हॉस्पिटलजवळील दोन जीप गाड्या रस्त्यावरून उचलत संबंधितांच्या प्लॉटमध्ये ठेवण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली, तसेच व्हीएचबी कॉलनी येथील मुख्य रस्त्यावरील दोन ॲम्बेसेडर कार जप्त करण्यात आल्या.
या परिसराकडे पाठ का?
मनपाच्या सर्व्हेमध्ये वाशिम बायपास परिसर, बायपास चाैक ते बाळापूर राेड, बायपास चाैक ते वाशिम राेड, अकाेटफैल राेड, फतेह अली चाैक ते दीपक चाैक, सुभाष चाैक, शिवनी ते शिवर मार्गावर माेठ्या संख्येने नादुरुस्त, बेवारस व भंगार वाहने आढळून आली आहेत. ही सर्व वाहने मुख्य रस्त्यालगत उभी आहेत. अशा वेळी या परिसराकडे मनपाने पाठ का फिरवली, असा सवाल उपस्थित झाला आहे.