अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीसाठी नवीन ११ सदस्यांची निवड प्रक्रिया शुक्रवारी मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडली. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आठ सदस्यांसह तीन सदस्यांनी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे अकरा सदस्यांची निवड करावी लागली. महापौर अर्चना मसने यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली.महापालिकेतील स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेले आठ सदस्य निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी मनपात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदस्य पदावरून निवृत्त झालेले आठ आणि समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देणाऱ्या तीन अशा एकूण अकरा सदस्यांची निवड करण्यात आली. भाजपाचे गटनेता राहुल देशमुख यांनी पक्षाच्यावतीने नगरसेवक सतीश ढगे, विजय इंगळे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार, संजय बडोणे यांची नावे सादर केली. शिवसेना आघाडीच्यावतीने गटनेता राजेश मिश्रा, शशि चोपडे, काँग्रेसच्यावतीने नगरसेविका चाँदनी रवी शिंदे व अजरा नसरीन मकसूद खान, राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीकडून राकाँच्या गटनेत्या शितल गायकवाड, भारिप-बमसंच्या नगरसेविका किरण बोराखडे अशा एकूण अकरा सदस्यांच्या निवड प्रक्रियेला महापौर अर्चना मसने यांनी मंजूरी दिली.
यांनी दिला राजीनामास्थायी समितीमध्ये एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या शिवसेनेच्या गजानन चव्हाण, काँग्रेसचे फिरोज खान आलियार खा आणि राष्ट्रवादीचे सदस्य फैय्याज खान यांनी समितीच्या सदस्य पदाचे राजीनामे गटनेत्या मार्फत सभेच्या पीठासिन अधिकारी अर्चना मसने यांच्याकडे सादर केले. ही पक्षांतर्गत बाब असल्याने त्यांच्या जागेवर पक्षातील इतर सदस्यांना संधी देण्यात आल्याचे दिसून आले.