अकोला: महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीच्या पृष्ठभूमीवर विभागीय आयुक्तांच्या दालनात काँग्रेस पक्ष वगळता इतर राजकीय पक्ष व आघाडीच्या सात गटनेत्यांच्या निवडीवर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी शिक्कामोर्तब केले. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित होते. गटनेता निवडीवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादाचा तिढा थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समक्ष सोडवल्या जाईल.स्थायी समितीच्या पुनर्गठणाची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या २0 मार्चपर्यंत स्थायी समिती सदस्यांची निवड होणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या सदस्य संख्येनुसार निवड प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. परंतु मनपा निवडणुकीत गठित केलेल्या आघाड्यांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी केल्याचा मुद्दा काही नगरसेवकांनी उपस्थित केला होता. त्यानुषंगाने नगर सचिव अनिल बिडवे यांनी विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन घेत, संबंधित पक्षांनी गटनेत्यांची नावे सुचविण्याचे पत्र दिले होते. राजकीय पक्षांसह आघाड्यांनी गटनेत्यांची निवड केल्याचे स्वाक्षरीनिशी पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सोपवले. प्राप्त पत्रावरील स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी नगरसेवकांना विभागीय कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात हजेरी लावली. यावेळी विभागीय आयुक्त ांच्या समक्ष सहा गटनेत्यांची निवड करण्यात आली.
अकोला महापालिकेतील ७ गटनेत्यांची निवड
By admin | Published: March 11, 2015 1:34 AM