प्रवीण खेते : अकोला : केंद्र शासनाच्या इन्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) योजनेंतर्गत राज्यातील आठ हजार शाळांची निवड बुधवारी करण्यात आली . निवड झालेल्या शाळांना टप्प्याटप्प्याने संगणक प्रयोगशाळा पुरविण्यात येणार असून, राज्यभरात ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच त्यांना माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण शाळेतच मिळावे, या अनुषंगाने शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत आयसीटी योजना राज्यात तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत राज्यातील आठ हजार शाळांची निवड करण्यात आली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ५00 शाळांची निवड करण्यात आली असून, यामध्ये अमरावती विभागातील ७८ शाळांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात २५00 शाळांपैकी ४७८ शाळा, तर तिसर्या टप्प्यात पाच हजार शाळांपैकी ३३६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. आयसीटी प्रयोगशाळांच्या माध्यमातून शिक्षकांनी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आयसीटीवर आधारित शिक्षण देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
*किमान पाच शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज
आयसीटी योजनेंतर्गत ज्या शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा आहे, अशा शाळेतील किमान पाच शिक्षकांना माहिती व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
*विद्यार्थ्यांंना मिळणार मोफत शिक्षण
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या अनुषंगाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना आयसीटी प्रयोगशाळेच्या माध्यमातून माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांंकडून कुठल्याच प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.