अकोटः नगर परिषद, पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत स्थापित महिला बचत गट यांना कोरोना काळात नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई व युनिसेफ यांच्यामार्फत मास्क शिलाईचे काम मिळाल्यामुळे नगर परिषदेत स्थापित नोंदणीकृत महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
शहरामध्ये दीनदयाल योजनेमध्ये आजपर्यंत ३५० महिला बचत गट नोंदणीकृत असून, यामधील ८४ शिलाई काम करणाऱ्या सभासदांची यादी शासनाला पाठविण्यात आली होती. त्यानुसार अकोट नगर परिषदेला १५ हजार २०२ मास्क शिवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये प्रेरणा शहर तर संघ नगर परिषद यांच्याअंतर्गत महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये शहरातील ८० महिलांनी सहभाग घेतला होता. ८० महिलांमधून २४ महिला ह्या मास्कची शिलाई करण्याकरिता इच्छुक होत्या. याकरिता मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ व नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे व शहर अभियान व्यवस्थापक सुनिता तायडे यांनी सर्व महिलांना योग्य मार्गदर्शन करून महिलांना कोरोनाच्या संकटकाळात रोजगार उपलब्ध करून दिला. अकोट शहराची राज्याच्या ३६ जिल्ह्यांमधून लोकसंख्येच्या आधारावर व बचत गटातील सदस्य संख्या या आधारावर निवड झाली होती. यामध्ये १५ हजार २०२ मास्क याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर या गटांमधून चार दिवसीय प्रशिक्षण देऊन महिलांकडून उद्दिष्ट पूर्ण झाले असून, २८ महिला बचत गटाला रोजगार मिळाला आहे. या उपक्रमासाठी शासनाने अकोट शहरातील बचत गटातील शेकडो भगिनींना मोलााचा हातभार लावला आहे, अशी माहीती समुदाय संघटक निलेश देशमुख यांनी दिली आहे. (फोटो)