अकाेला : काँग्रेस पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असे जाहीर केले हाेते, जिल्हा परिषद पाेटनिवडणुकीत त्यानुसार रणनीती आखली आहे. पक्षाची ही भूमिका आहे, ती वारंवार सांगण्याची गरज नाही. मनपा निवडणुकीच्या वेळी त्याबाबत रीतसर बाेलूच. स्वबळाचा मी दिलेला आवाज बुलंदच आहे, ताे काेणीच दाबलेला नाही, मी नाना आहे... काेणाला दबत नाही, अशा शब्दात स्वबळाचा दावा साेडलेला नाही, हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी अधाेरेखित केले.
स्थानिक स्वराज्य भवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लाेंढे, जिल्हाध्यक्ष अशाेकराव अमानकर, महानगर अध्यक्ष बबनराव चाैधरी यांचेसह मान्यवर उपस्थित हाेते. पटाेले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असल्याने सर्वांना घेऊन चालावे लागते. प्रभाग रचनेवरून आमचे कुठल्याच पक्षाशी मतभेद नाहीत, महापालिकांसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना जाहीर झाल्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी त्याला विराेध केला. ही भावना आम्ही सरकारपर्यंत पाेहोचविली आहे. ती मान्य हाेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लाेकसभेत करेक्ट कार्यक्रम करताे
अकाेला लाेकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादी ठरवते अशी चर्चा आहे, याबाबत छेडले असता काेण काेणाचा उमेदवार ठरविणार हे काळच सांगेल, तुम्ही बघत राहाल २०२४ मध्ये मी करेक्ट कार्यक्रम करताे, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिला.
आजचा बंदमध्ये सहभागी हाेणार
शेतकरी व कामगारविराेधी कायद्यांच्या विराेधात देशभर आंदाेलन पेटले आहे. राजधानीच्या सीमेवर शेतकरी वर्षभरापासून आंदाेलन करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी अशी दीर्घकाळ आंदाेलने झाली आहेत, मात्र स्वातंत्र्यानंतर गेल्या ७४ वर्षांत सर्वाधिक कालावधीचे हे पहिलेच आंदाेलन आहे. मात्र केंद्र सरकारने झाेपेचे साेंग घेत या आंदाेलनाकडे पाठ फिरविली आहे. केंद्राला जागे करत जाब विचारण्यासाठी साेमवारी भारत बंदची हाक दिली असून मी अकाेल्यातील बंदमध्ये सक्रिय सहभागी हाेईन, अशी माहिती त्यांनी दिली.
लवकरच महानगर अध्यक्षांची निवड
काँग्रेसला नवीन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. आता लवकरच महानगर अध्यक्षांचीही निवड करणार असल्याची ग्वाही पटाेले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.