अकोला : शहरातील एका बँकेकडे फ्लॅट गहाण ठेवला आणि बँकेच्या कर्जाचा बोजा कमी न करताच, दोघांनी संगनमत करून सेवानिवृत्त शिक्षकाला फ्लॅट विकून त्यांची आठ लाख रुपयांनी फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला. गोरक्षण रोडवरील माधव नगरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक हेमंत चंद्रसिंह बैस (५९) यांच्या तक्रारीनुसार माधव नगरातीलच छाया महादेव चौगुले आणि अरविंद श्यामराव काळमेघ यांनी एका बँकेकडून कर्ज काढून गजानन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विकत घेतला; परंतु या फ्लॅटवर बँकेच्या कर्जाचा बोजा असताना, त्यांनी कागदोपत्री बँकेचा कोणताही बोजा नसल्याचे दर्शवून हेमंतसिंह बैस यांना त्या फ्लॅटची १८ लाख रुपयांमध्ये विक्री केली; परंतु काही महिन्यांनंतर बँकेचे अधिकारी फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी बँकेचे कर्ज असून, ते देण्याचा तगादा लावला. हेमंत बैस यांनी हा फ्लॅट आपण विकत असल्याचे सांगितले. बैस यांना आपली फसवणूक झाल्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली; परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. अखेर त्यांनी न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. खदान पोलिसांनी छाया महादेव चौगुले आणि अरविंद श्यामराव काळमेघ यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला.
बँकेकडे गहाण असलेला फ्लॅट विकून फसवणूक!
By admin | Published: May 03, 2017 1:01 AM