अकोला: ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्त्व वाढले असून, पालक कॉन्व्हेंट संस्कृतीकडे आकृष्ट झाले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण, दर्जा याविषयी शंका व्यक्त केली जात असली तरी, त्यात फारसे सत्य नाही. अद्यापही अनेक जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता सुधारत आहे. कोळासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मात्र शिक्षणाच्या बाजारीकरणातही आपले स्थान टिकवून ठेवले आहे.बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील जिल्हा परिषद शाळेत सेमी-इंग्रजी शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. येथील शिक्षण, मेहनती मुख्याध्यापक, शिक्षकांमुळे कॉन्व्हेंट, खासगी शाळांमधील मुले आता जि.प. शाळेकडे वळली आहेत. शाळेमध्ये कॉन्व्हेंटसुद्धा चालविले जाते. त्यामुळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी कोळासा गावास मांडोली गावातील विद्यार्थीसुद्धा येतात. दोन-तीन वर्षांपूर्वी शाळेची पटसंख्या घटली होती; परंतु मुख्याध्यापक दरबार राठोड व त्यांच्या शिक्षकांनी परिश्रमातून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली. त्यामुळे गावांमधील एकही मूल बाहेरच्या खासगी शाळेत शिकायला जात नाही. एवढेच नाही, तर पालकांचासुद्धा शिक्षकांना चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे लोकसहभागातून ग्रामस्थांनी शाळेसाठी साडेतीन लाख रुपयांचा निधी गोळा केला. आठ वर्गांपैकी पाच वर्षेडिजिटल झाले आहेत. शाळेची गुणवत्ता पाहून बालभारतीने शाळेला प्रोजेक्टर भेट दिले आहे. गतवर्षात इंग्रजी शाळेत शिकणारे ४0 विद्यार्थी मराठी शाळेत दाखल झाले, हे विशेष. शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. यासोबतच विद्यार्थ्यांच्या बिस्कीट निर्मिती कारखान्यास भेट, शैक्षणिक सहल, विज्ञान मेळावा, वन भोजन, क्षेत्र भेट यासारखे उपक्रमसुद्धा राबविले जातात. सतत १0 वर्षांपासून शाळेला क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळत आहे. त्यामुळेच कोळासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढत आहे. मोफत शिक्षण, शासनाच्या योजनांचा लाभ आणि दर्जेदार शिक्षणामुळे ही शाळा नावारूपाला येत आहे.
शाळेत चालविल्या जाते विद्यार्थी बचत बँक!शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावे, या दृष्टिकोनातून शाळेत विद्यार्थी बचत बँकेची स्थापना केली आहे. या बचत बँकेमध्ये खाऊचे पैसे जमा करतात. विद्यार्थ्यांना पासबुक, स्लिप देण्यात आल्या आहेत. दर शनिवारी बँकेत पैसे भरण्याची सुविधा आहे. सोमवारी विद्यार्थी पैसे काढू शकतात. यासोबतच क्षेत्र भेटीतून, व्यवसाय, शेतीचेसुद्धा ज्ञान दिले जाते.
दर रविवारी शाळेत मोफत शिकवणी वर्ग!विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा, यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक दर रविवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेतला जातो.शाळेत सेमी-इंग्रजी शिक्षण दिल्या जाते. यासोबतच शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल शाळेकडे वाढला आहे. यंदा कॉन्व्हेंटमधील ४0 विद्यार्थी आमच्या शाळेत दाखल झाले.-दरबार राठोड, मुख्याध्यापक.गत काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. दर्जेदार व मोफत शिक्षण मिळत असल्याने गावातील विद्यार्थी बाहेरच्या खासगी शाळांमध्ये जात नाहीत. गावातच विद्यार्थी शिक्षण घेतात.-विजय वानखडे, पालक.