अकाेला : महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यानंतर जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांमध्ये आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणे अपेक्षित हाेेेेते. घटक पक्षांकडून समितीसाठी सदस्यांच्या नावाची यादीच न आल्याने सर्व समित्या रखडल्या आहेत. नियाेजन समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. नियाेजन समितीवरील नामनिर्देशित व विशेष आमंत्रित सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने प्रसिद्ध केले असून या सदस्यांमध्ये शिवसेनेचा वरचष्मा आहे
समितीवर नामनिर्देशित सदस्यांमध्ये बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख तसेच विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे आमदार अमाेल मिटकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये काँग्रेसचे डाॅ. पुरुषाेत्तम दातकर, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव तथा गाेविंदप्रसाद चाैधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, प्रदेश संघटन सचिव कृष्णा अंधारे, प्रहारचे माजी जिल्हा संघटक राजेंद्र खाराेडे, मनाेज पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते गाेपाल दातकर, शिवसेनेचे अकाेला पूर्व शहर प्रमुख राजेश मिश्रा, उमेश जाधव यांचा समावेश आहे.
सेनेचे सदस्य वाढले
विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहारचे प्रत्येकी दाेन तर शिवसेनेचे तीन सदस्य निवडण्यात आले आहेत. नियाेजन समितीमध्ये शिवसेनेचा टक्का वाढला आहे.
नेत्यांना संधी मिळाली कार्यकर्त्यांना प्रतीक्षाच
नियाेजन समितीमध्ये नेत्यांना संधी देण्यास प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चाैधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शिवसेनेचे पूर्व शहरप्रमुख राजेश मिश्रा, जिल्हाप्रमुख पदासाठी चर्चेत असलेले जिल्हा परिषद सदस्य गाेपाल दातकर नेत्यांची वर्णी लागली आहे. आता कार्यकर्त्यांची नावे इतर समितीसाठी कधी अंतिम हाेतील, याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीत ऐनवेळी कापले महानगरमधील नाव
नियाेजन समितीवर शिफारस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह एक नाव अकाेला महानगरमधून घेण्यात आले हाेते, मात्र पक्षाकडे प्रतिष्ठा करून वेळेवर त्या पदाधिकाऱ्याचे नाव मागे पडल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे.