अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरत असला, तरी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, या संभ्रमात आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने २६ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले; परंतु विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. १ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ४० हजार ८८४ विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील एकूण शाळा १८६८
जिल्ह्यातील एकूण गावे ९९८
पहिली ते आठवीचे तालुकानिहाय विद्यार्थी
अकोला पं.स.- ९१६७४
अकोट- ३४४५५
बाळापूर- २५५२४
बार्शीटाकळी- १७०११
मूर्तिजापूर- २००६३
पातूर- १७१६५
तेल्हारा- २१८४२
मनपा क्षेत्र- ७४७९
आठवी ते दहावीला अल्प प्रतिसाद
सध्या सुरू असलेल्या शाळा - ४१५
विद्यार्थ्यांची उपस्थिती (३१ जुलै) - ४०,८८५
पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता
ऑनलाइन अध्यापनात वेळेची मर्यादा असल्याने मुलांच्या आकलनाचा प्रश्न उद्भवतो. तरी कोरोना संकटकाळात मुलांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. गावात रुग्ण नसला तरी शिक्षक, तसेच काही विद्यार्थी बाहेरगावातून येणारे आहेत. त्यामुळे संक्रमणाचा धोका टळलेला नसल्याने पुनर्निर्णय व्हावा.
- गणेश पाटील, पालक
महाविद्यालयीन मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे शासन सांगत आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याची घाई मात्र नाहक सुरू आहे. लसीकरणाचा पत्ता नाही, रुग्णसंख्या अद्याप ४० च्या खाली आलेली नसताना, लहान मुलांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे.
- रितेश गवई, पालक