अकोला : श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या योजनांतर्गत लाभार्थीना ३१ मार्चपर्यंत हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कोरोना काळातही जिल्ह्यातील ज्येष्ठ लाभार्थीना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे ''लोकमत''ने केलेल्या ''रिॲलिटी चेक'' मध्ये आढळून आले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभार्थीना दरमहा प्रत्येकी एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी योजनेंतर्गत ज्येष्ठ लाभार्थीना दरवर्षी ३१ मार्चपर्यंत हयातीचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही ज्येष्ठ लाभार्थींना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ९ हजार ४५० लाभार्थी असून, हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये सादर करण्यासाठी ज्येष्ठ लाभार्थीना कोरोना काळातही धडपड करावी लागत आहे.
जिल्ह्यातील एकूण लाभार्थी
१,०९,४५०
श्रावण बाळ योजना
५१,६७९
संजय गांधी निराधार योजना
३६,४३३
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना
२१,३३८
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत ज्येष्ठ लाभार्थींनी हयातीचा दाखला मार्चअखेरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तथापि कोरोना संसर्ग काळात हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थींनी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी करू नये. संबंधित तलाठ्यांमार्फत हयातीचा दाखला दिल्यास ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- राहुल वानखेडे
तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना), जिल्हाधिकारी कार्यालय.