अकोला: जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरण सुरू आहे. ही प्रक्रिया जवळपास मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. या टप्प्याला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. कोविड लसीकरण मोहीमेंतर्गत सध्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांसर इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जात आहे. यामध्ये पोलीस, स्वच्छता कर्मचारी, महसूल कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना सोबतच लस दिली जात असून, सोमवारपासून अनेकांना लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. फ्रंट लाईनकर्मचाऱ्यांना पहिला आणि दुसरा डोस देण्याची प्रक्रिया मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, लसीकरणाचा पुढील टप्पा एप्रिल महिन्यात सुरू होणार असून, यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ट नागरिकांना लस दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.