अकोला:ज्येष्ठ महिलांना भेडसावणार्या समस्या व त्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने विदर्भात प्रथमच ज्येष्ठ महिलांसाठी अधिवेशन आयोजित केले जात आहे. १५ डिसेंबर रोजी अकोल्यात होऊ घातलेल्या या एक दिवसीय अधिवेशनात पाच जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने विदर्भात प्रथमच ज्येष्ठ महिलांसाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजी अकोल्यातील रामदासपेठ परिसरातील स्वामी सर्मथ केंद्रात सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत हे अधिवेशन पार पडेल. ज्येष्ठ महिलांना एकत्र आणणे, त्यांना उतारवयात भेडसावणार्या कौटूंबिक, मानसिक व शारिरीक समस्यांवर प्रकाशझोत टाकणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे, हा या अधिवेशनामागचा उद्देश आहे. महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षा अलका व्यास या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उपस्थित राहतील. राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ.आशा मिरगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. उतारवयात ज्येष्ठ पुरुष, महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शारिरीक, मानसिक तसेच कौटूंबिक समस्या लक्षात घेता, ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. आयुष्यातील अडचणींवर मात करून सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, याकरीता ज्येष्ठ महिलांसाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चौथमल सारडा यांनी स्पष्ट केले.
विदर्भात प्रथमच ज्येष्ठ महिलांचे अधिवेशन
By admin | Published: December 04, 2014 11:58 PM