अकोला : ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनामार्फत लसीचा पुरवठा केला जात आहे. मागील दोन दिवसापासून लसीचा तुटवडा निर्माण झाला असून मंगळवारी महापालिकेच्या चार केंद्रांमध्ये लस उपलब्ध नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरी परत जावे लागले. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविशिल्ड ही लस उपलब्ध होण्याची आशा वर्तविली जात आहे.
केंद्र शासनाने कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी मार्च महिन्यात ६० वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली. त्यानंतर पंचेचाळीस वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी ही लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील विविध नऊ केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून दिली. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता केंद्र शासनाने १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी ही लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला आहे. दरम्यान, यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या स्तरावर ठराविक चार केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तर इतर पाच केंद्रांमध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरु केली. दरम्यान, चार केंद्रांमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध नसल्याचे मंगळवारी समोर आले. याबद्दल माहिती नसल्यामुळे भर उन्हात लस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परत यावे लागले.
या चार केंद्रांत ठणठणाट
लस घेण्यासाठी युवकांची व ज्येष्ठ नागरिकांची एकाच लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेत महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी चार केंद्रांमध्ये लस उपलब्ध करून दिली. यामध्ये हरिहर पेठ येथील नागरी आरोग्य केंद्र, सिंधी कॅम्प येथील खडकीमध्ये सुरू असलेले नागरी आरोग्य केंद्र, कृषी नगर येथील नागरी आरोग्य केंद्र व आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालयाचा समावेश आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे ही चारही केंद्र बंद होती.
कालमर्यादा संपली ; ज्येष्ठ नागरिकांमध्ये धाकधूक
शहरातील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यात घेणे गरजेचे आहे. यातील बहुतांश नागरिकांची दुसऱ्या डोससाठी घेतली जाणारी कालमर्यादा संपल्याची माहिती आहे. कालावधी संपल्यामुळे दुसरा डोस घ्यायचा की नाही यावरून ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.