अकोला, दि. ५: मार्च महिन्यापासून सराफा बाजारावर आलेले मंदीचे सावट अजूनही कायमच आहे. उत्पादन शुल्काच्या विरोधात केलेल्या देशव्यापी संपाचा फटका अकोल्यास ५0 कोटीने बसला होता अकोल्याची सराफा बाजारपेठ अजूनही यातून सावरलेली नाही.आगामी सणासुदीच्या दिवसात तरी हे नुकसान भरून निघण्याची शक्यता कमी आहे.उत्पादन शुल्काच्या जाचक नियमावलीचा विरोध करण्यासाठी देशभरातील सराफा व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवून निषेध नोंदविला. अकोला शहरातील १२५ आणि जिल्हय़ाभरातील जवळपास ७00 दुकानदार यामध्ये सहभागी झाले होते. अकोला जिल्हा सराफा असोसिएशनच्या पदाधिकार्यांना या आंदोलनाचा फटका ५0 कोटींच्या घरात बसला आहे. त्यानंतर भाजपाच्या मध्यस्थीने हे आंदोलन सोडवून उत्पादन शुल्काच्या नियमात फेरबदल करण्यात आला.दरम्यान, सोन्याचे भाव २५,000 रुपयांवरून ३१,000 वर पोहोचले. सोन्याचे भाव कमी-जास्त होत अस तानाही सराफा बाजारातही चढ-उतार कायम असतो; मात्र गेल्या मार्च महिन्यापासून अकोला सराफा बाजारात मंदीचे सावट आले आहे. गणेशोत्सवापासून सणासुदीला सुरुवात होत आहे. सोबतच यंदा पाऊसपाणी चांगले असल्याने पिकांची स्थितीही बरी आहे. त्यामुळे बाजारपेठेत तेजी येईल, असा अंदाज बांधला जात आहे; मात्र अजून तरी बाजारपेठेवर काहीही परिणाम झालेला नाही. बाजारपेठेत आलेल्या इतर व्यवसायातील मंदीप्रमाणेच सराफा बाजारातही मंदीची लाट असून सराफांना मंदी अधिक तीव्र जाणवू लागली आहे. सराफा बाजारातील मंदीचे चित्र लवकरच बदलेल, अशी आशा अकोला शहर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सराफ आणि सचिव प्रकाश लोढिया यांनी व्यक्त केली आहे.
सराफा बाजारावर मंदीचे सावट कायम!
By admin | Published: September 06, 2016 2:22 AM