सामान्य कुटुंबातील वनविभागाची परीक्षा देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी झालेल्या दिपाली चव्हाण या हरीसाल येथे कार्यरत होत्या. हरीसालसारख्या दुर्गम भागात वनपरिक्षेत्र अधिकारी या नात्याने कर्तव्य निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडत असताना शिवकुमार लहानसहान बाबीवरून दिपाली चव्हाण यांना त्रास देत हाेते. या प्रकाराला कंटाळून आत्महत्येसारखा मार्ग निवडून दिपाली चव्हाण यांनी आपले जीवन संपविले. आत्महत्या करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात तिने शिवकुमार करीत असलेल्या जाचाचा पाढाच वाचला. यापूर्वीसुद्धा अनेकदा तो देत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल तक्रारी दिल्या.
महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मानसिक व शारीरिक अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिवकुमार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या रेड्डी यांना निलंबित करून त्यांना सहआरोपी करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार पवार यांना अखिल भारतीय मराठा महासंघ मूर्तिजापूर यांच्या वतीने दिले आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे, उपाध्यक्ष हरिभाऊ वानखडे, शहर अध्यक्ष शरद हजबे, दीपक बनारसे, गजानन काळसरपे, अरुण लिंगाडे, मुन्ना नाईकनवरे, नगरसेवक सचिन देशमुख, सुनील भोईकर, जय मोहिते, निवृत्ती कान्हेरकर, आशिष कोकाटे, शाम येवले, अविनाश भिसे, विश्वास राऊत, मनोज तायडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.